Wednesday, 29 April 2020

बाबा...

किती वर्षे, जगलात… ह्याहून अधिक महत्त्वाचे असते ते ती वर्षे, किती समृद्धपणे आयुष्य जगलात.
 बाबा मला नक्कीच कमी मिळाले पण ती वर्षे माझ्यासाठी अनमोल आणि समृद्ध होती.
त्या सहवासात त्यांनी आम्हाला जे शिकवलं, जे संस्कार केले, ते आज समर्थपणे पुढच्या पिढी पर्यंत पोचत आहेत.
एखादी व्यक्ती जेव्हा आपल्यातून जाते ना तेव्हा त्यांना शेवटचे पाहणे इतके क्लेशदायक नसते जेवढे त्यांच्या शिवाय जगणे. रोज ती पोकळी भरून काढण्याचा प्रयन्त करणे. मग हळूहळू आपल्या हे लक्षात येते की आपण फक्त त्या व्यक्तीला पाहू शकत नाही पण त्यांचे अस्तित्व असते अगदी आपल्या आसपास.
 बाबा फक्त आमच्याच मनात नाहीत  तर ज्यांना ज्यांना  बाबांच्या सहवासाचा परिस स्पर्श झाला आहे अश्या सर्वांच्या मनात ते आजही आहेत, असंख्य आठवणी आणि अनुभवांच्या रूपात, त्यांचं व्यक्तिमत्त्व होतचं तसं. 
लोक म्हणतात गेलेली माणसं विस्मृतीत जातात पण बाबा आजही आहेत.त्यांच्यावर प्रेम करणारे मित्र,सहकारी, नातेवाईक, शेजारी अगदी त्यांना ओळखणाऱ्या प्रत्येकाने त्यांना जतन करून ठेवलंय स्मृती रूपाने.
ह्या स्मृतींनी, त्यांच्या आठवणींनी बाबांना अशाही सर्वांशी जोडलंय ज्यांनी कधी न त्यांना पाहिले ना भेटले.
माझ्या बाबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला आज त्यांच्या स्मृतिदिना दिवशी माझे वंदन.
गौरी भिडे-दातार
२९ एप्रिल २०२०
WhatsApp

Thursday, 2 April 2020

वेळ मिळालाय….

वेळ मिळालाय….

वेळ मिळालाय पुन्हा rewind व्हायला,

राहिलेलं, चुकलेले शोधायला,
निसटलेलं, लपलेलं बघायला,
मनात असलेलं सारं करायला,

वेळ मिळालाय पुन्हा rewind व्हायला…

तुटलेली, बोचलेली, हरवलेली पण हवीहवीशी वाटणारी माझी माणसं शोधायला,
समज, गैरसमज मागे सारून पुन्हा नव्याने जगायला,
कधी मनातलं, न बोललेलं मनसोक्त बोलायला,

वेळ मिळालाय पुन्हा माझी नाती revive करायला….

लहानपणीची स्वप्न, आवडी-निवडी जपायला,
आपल्यातील कलाकार शोधायला,
मोठं झाल्यावर काय काय करायचे होते मला??
ती यादी हुडकायला,
Success आणि status च्या गर्दीत हरवलेलं
ते स्वप्नाळू मुलं शोधायला,

वेळ मिळालाय पुन्हा ती स्वप्न rewind करून पहायला…

लहानपणी शिकलेली स्तोत्र, पाढे, परवचा पुन्हा म्हणायला,
आई-आजी ने शिकवलेलं सारं करून पहायला,
सूर्य-नमस्कार, योगासने, जोर-बैठका काढायला,

वेळ मिळालाय पुन्हा rewind होऊन बालपण जगायला…

मिळालेल्या Rewind बटणाचा योग्य वापर करायला,
देवा आता तरी शिकव आम्हाला चांगले वाईट पहायला,

प्रेमाच्या माणसांवर प्रेम करायला,त्यांना जपायला,
एकदाच मिळणारे हे आयुष्य नव्याने सुरू करायला,

वेळ मिळालाय पुन्हा rewind व्हायला…

  • गौरी भिडे-दातार.


WhatsApp

Saturday, 15 June 2019

स्वप्नांचे गाव (कविता)



स्वप्नांचे गाव

 
स्वप्नाच्या किनाऱ्यावर एक सोनेरी गाव,


निर्मळ नदीवर डोलणारी चंद्राची नाव,

 
नवे क्षितिजनवी दिशानवे रंगनवी आशा,



जुन्या रस्त्यावरचे नवीन वळण,


नवा प्रवासनवे मन,

 
सारे काही नवे कोरेतुझ्या प्रेमाचे कंगोरे,


तुझे शब्दमाझी बाततुझी साथमाझे हात,


तुझ्या माझ्या प्रेमाचे हे रुपेरी पिसारे,


जणू स्वप्नांच्या गावाचे मखमली किनारे.

 
-        गौरी.



WhatsApp

Friday, 7 June 2019

आजोळ ( आजी आजोबांचे घर)





आजोळ ( आजी आजोबांचे घर)



परीक्षेचा कंटाळा येऊ लागताच, दिवसही तापू लागतात. पुढच्या पेपराच्या तयारी पेक्षा परिक्षेनंतरचे स्वप्नरंजन सुरू होते, हळूहळू माठ खाली येतात, मोगऱ्याचा वास आणि आंब्याचा मोहोर खुणावू लागतो आणि वर्षभर वाट पाहून एकदाची सुट्टी सुरू होते.

आपल्या लहानपणच्या ढिगभर आठवणी घेऊन यायचं तर आपल्यापेक्षा आतुरतेने मुलांचे आजोळ आणि आजी आजोबा आतुरतेने वाट बघत असतात. 

आपली जशी यादी तयार असतें ना, हे करायचं, असं करायचं  त्याहूनही मोठी यादी आजी आजोबांची असते. 

नातवंडांच्या सगळ्या इच्छा, अपेक्षा तर पूर्ण होतातच पण त्यांची सुट्टी अविस्मरणीय करण्याची खटपट अगदी जोमानी सुरू असते.
मुलांचे आवडीचे पदार्थ तर आपण नेहमीच करतो पण आजीच्या हातची धिरडी किंवा गरमागरम पोळी त्यांना महागड्या पिझ्झा, बर्गर पेक्षा तृप्त करून जाते.
मुलात मुलं होणं काय असते हे ह्यांच्याकडे पाहून कळते.आपण जे रोजचे भरवणे,आवरणे, अंघोळ घालणे हे चिडचिडत किंवा गडबडत करतो ना त्याचा ही हे आजी आजोबा सोहळाच करतात, उन्हातली आंबा लावून  झलोणी काय, बागेत टब मांडून शाही स्नान काय, घोड्याची बग्गी बोलवून शहरभर रपेट काय… कसं आणि काय काय सुचते ना ह्यांना.
परतीच्या वाटेवर बाटली भर साखरआंबा, लोणची,पापड,  आभाळभर आनंद आणि पुढच्या सुट्टीची अगणित स्वप्न  घेऊन निघताना मला एका जबाबदारीची जाणीव होत आहे. 

आज नाही पण पुढच्या २०-२५ वर्षांनी मलाही कोणाची तरी सुट्टी अशीच अवर्णनीय, अविस्मरणीय करायची आहे. ही जाणीव किंवा ही भावना मला आत्ताच भविष्यातला आनंद देऊन गेली आणि मलाच मा‍झ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले, कुठून येतो इतका उत्साह, कश्या सुचतात ह्या भन्नाट कल्पना.त्यासाठी बहुदा फक्त नातवंड उपभोगता यावी लागतात.

नातवंड आणि आजी आजोबा हे ह्या जगातले सर्वात नि-स्वार्थी नातं असतं,दोघंही एकमेकांना भरभरून आनंद देतच राहतात. आपण त्यांना कितीही गोष्टी घेऊन दिल्या, त्यांच्या वर कितीही खर्च केला तरी आजीची कुशी आणि आजोबांच्या पाठीवरल्या घोड्याला कशाची तोड नाही.

आपल्या आठवणी आठवताना आपण किती नशीबवान होतो ना असं आपण म्हणतो, पण आपल्या पोरांच्या ह्या तयार होणाऱ्या आठवणी तेही तितकेच नशीबवान असल्याचे पक्के करतात.

नसेल त्याच्या आजोळी वाडा, नसेल शेत, नसतील बागा, नसतील गावची घरं पण आजोळाला आजोळ बनवणारे आजी आजोबा असणे हेच नशीबाचं दान खरं.


गौरी भिडे-दातार
WhatsApp

न जिंकता आलेली अट ...





  जिंकता आलेली अट ... 

काही आठवणी जुन्याच होत नाहीत, कारण काही  ठिकाणं  आपल्या त्या आठवणी पुन्हा पुन्हा समोर आणून ठेवतातअसेच हे एक ठिकाण पुण्यातील गरवारे पुलावरून फर्ग्युसन कॉलेज कडे जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या हाताला असलेले हे छोटेखानी रेस्टोरंट 'सरोवर '. तुमच्या पैकी कोणाच्या कदाचित लक्षातही आले नसेल पण मी जेव्हा जेव्हा इथून जाते मला नेहमी माझा आणि बाबांचा संवाद  आठवतो ...

साल काही लक्षात नाही शाळेत होते मी, कोणत्या तरी मीटिंग साठी बाबा ह्या हॉटेल मध्ये गेले होते, त्यांनी घरी येऊन त्याचे वर्णन केले असेल कदाचितत्या वेळी बहुतांशी हॉटेल हि उडपी  प्रकारात मोडत जिथे इडली, डोसा असे बरेच पदार्थ मिळत किंवा मग थाळी मिळणारी हॉटेलं (इतर ठिकाणे होती पण आता इतके प्रस्थ न्हवते), म्हणून  हे छोटे हॉटेल जरा वेगळे वाटायचे इथे पंजाबी पद्धतीचे जेवण मिळे आणि हो AC पण होता, दारावर एक पोशाखधारी दरवान त्याची शान वाढवायचा, थोडक्यात काय  हे ठिकाण तसे काही पॉकेट फ्रेंडली न्हवते, बाबांच्या वर्णन कौशल्याने मला अगदी 'कधी जाते इथे' असे झाले होते, मग काय लगेच मी बाबांकडे हट्ट केला , "बाबा आपणपण  जाऊ या ना इथे एकदा जेवायला", जे बाबांना ओळखतात त्यांना माहित आहेच ते कधीच  डिरेक्टली नाही म्हणून दुखावत नसत, ह्याचा अर्थ ते सगळ्यांच्या मनासारखे करायचे असा नाही बरं का, जे योग्य तेच करायचे पण कोणालाही दुखवतातर ते मला  म्हणाले," जाऊया की  तू सहामाही परीक्षेत पहिली ये मग जाऊ" त्यांना कदाचित खात्री असेल की  हि अट माझी मागणी बरीच लांबणीवर टाकेल ...  आणि अर्थातच तो योग कधीच आला नाही, कधी थोड्या तर कधी खूप जास्त मार्कानी पहिला नंबर  हुकतंच  गेला आणि सरोवर मधले जेवण राहून गेले, आता त्या हॉटेलचा रुबाब शिल्लक नाही, मला तिथे न्यायला बाबा नाहीत आणि पहिला नंबर आणायला सहामाही परीक्षा हि नाहीत

गेले कित्येक वर्ष मी आर्थिक सबळ आहे, माझे निर्णय घेऊ शकते, मला हवे तेव्हा मी ह्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन जेऊ शकले असते पण आजही तिथून जाताना माझे  मन मला ह्या अटीची आठवण करून देते आणि कमावता आनंद घेण्याची परवानगी देत नाही

आयुष्यात गोष्टी कामवाव्या लागतात आणि कमावलेल्या गोष्टीच सुख देतात हेच खरं

गौरी भिडे-दातार 


WhatsApp

बाबा...

किती वर्षे, जगलात… ह्याहून अधिक महत्त्वाचे असते ते ती वर्षे, किती समृद्धपणे आयुष्य जगलात.  बाबा मला नक्कीच कमी मिळाले पण ती वर्ष...