न जिंकता आलेली अट ...
काही आठवणी जुन्याच होत नाहीत, कारण काही ठिकाणं आपल्या त्या आठवणी पुन्हा पुन्हा समोर आणून ठेवतात, असेच हे एक ठिकाण पुण्यातील गरवारे पुलावरून फर्ग्युसन कॉलेज कडे जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या हाताला असलेले हे छोटेखानी रेस्टोरंट 'सरोवर '. तुमच्या पैकी कोणाच्या कदाचित लक्षातही आले नसेल पण मी जेव्हा जेव्हा इथून जाते मला नेहमी माझा आणि बाबांचा संवाद आठवतो ...
साल काही लक्षात नाही शाळेत होते मी, कोणत्या तरी मीटिंग साठी बाबा ह्या हॉटेल मध्ये गेले होते, त्यांनी घरी येऊन त्याचे वर्णन केले असेल कदाचित, त्या वेळी बहुतांशी हॉटेल हि उडपी प्रकारात मोडत जिथे इडली, डोसा असे बरेच पदार्थ मिळत किंवा मग थाळी मिळणारी हॉटेलं (इतर ठिकाणे होती पण आता इतके प्रस्थ न्हवते), म्हणून हे छोटे हॉटेल जरा वेगळे वाटायचे इथे पंजाबी पद्धतीचे जेवण मिळे आणि हो AC पण होता, दारावर एक पोशाखधारी दरवान त्याची शान वाढवायचा, थोडक्यात काय हे ठिकाण तसे काही पॉकेट फ्रेंडली न्हवते, बाबांच्या वर्णन कौशल्याने मला अगदी 'कधी जाते इथे' असे झाले होते, मग काय लगेच मी बाबांकडे हट्ट केला , "बाबा आपणपण जाऊ या ना इथे एकदा जेवायला", जे बाबांना ओळखतात त्यांना माहित आहेच ते कधीच डिरेक्टली नाही म्हणून दुखावत नसत, ह्याचा अर्थ ते सगळ्यांच्या मनासारखे करायचे असा नाही बरं का, जे योग्य तेच करायचे पण कोणालाही न दुखवता. तर ते मला म्हणाले," जाऊया की तू सहामाही परीक्षेत पहिली ये मग जाऊ" त्यांना कदाचित खात्री असेल की हि अट माझी मागणी बरीच लांबणीवर टाकेल ... आणि अर्थातच तो योग कधीच आला नाही, कधी थोड्या तर कधी खूप जास्त मार्कानी पहिला नंबर हुकतंच गेला आणि सरोवर मधले जेवण राहून गेले, आता त्या हॉटेलचा रुबाब शिल्लक नाही, मला तिथे न्यायला बाबा नाहीत आणि पहिला नंबर आणायला सहामाही परीक्षा हि नाहीत.
गेले कित्येक वर्ष मी आर्थिक सबळ आहे, माझे निर्णय घेऊ शकते, मला हवे तेव्हा मी ह्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन जेऊ शकले असते पण आजही तिथून जाताना माझे मन मला ह्या अटीची आठवण करून देते आणि न कमावता आनंद घेण्याची परवानगी देत नाही .
आयुष्यात गोष्टी कामवाव्या लागतात आणि कमावलेल्या गोष्टीच सुख देतात हेच खरं.
गौरी भिडे-दातार

No comments:
Post a Comment