आजोळ ( आजी आजोबांचे घर)
परीक्षेचा कंटाळा येऊ लागताच, दिवसही तापू लागतात. पुढच्या पेपराच्या तयारी पेक्षा परिक्षेनंतरचे स्वप्नरंजन सुरू होते, हळूहळू माठ खाली येतात, मोगऱ्याचा वास आणि आंब्याचा मोहोर खुणावू लागतो आणि वर्षभर वाट पाहून एकदाची सुट्टी सुरू होते.
आपल्या लहानपणच्या ढिगभर आठवणी घेऊन यायचं तर आपल्यापेक्षा आतुरतेने मुलांचे आजोळ आणि आजी आजोबा आतुरतेने वाट बघत असतात.
आपली जशी यादी तयार असतें ना, हे करायचं, असं करायचं त्याहूनही मोठी यादी आजी आजोबांची असते.
नातवंडांच्या सगळ्या इच्छा, अपेक्षा तर पूर्ण होतातच पण त्यांची सुट्टी अविस्मरणीय करण्याची खटपट अगदी जोमानी सुरू असते.
मुलांचे आवडीचे पदार्थ तर आपण नेहमीच करतो पण आजीच्या हातची धिरडी किंवा गरमागरम पोळी त्यांना महागड्या पिझ्झा, बर्गर पेक्षा तृप्त करून जाते.
मुलात मुलं होणं काय असते हे ह्यांच्याकडे पाहून कळते.आपण जे रोजचे भरवणे,आवरणे, अंघोळ घालणे हे चिडचिडत किंवा गडबडत करतो ना त्याचा ही हे आजी आजोबा सोहळाच करतात, उन्हातली आंबा लावून झलोणी काय, बागेत टब मांडून शाही स्नान काय, घोड्याची बग्गी बोलवून शहरभर रपेट काय… कसं आणि काय काय सुचते ना ह्यांना.
परतीच्या वाटेवर बाटली भर साखरआंबा, लोणची,पापड, आभाळभर आनंद आणि पुढच्या सुट्टीची अगणित स्वप्न घेऊन निघताना मला एका जबाबदारीची जाणीव होत आहे.
आज नाही पण पुढच्या २०-२५ वर्षांनी मलाही कोणाची तरी सुट्टी अशीच अवर्णनीय, अविस्मरणीय करायची आहे. ही जाणीव किंवा ही भावना मला आत्ताच भविष्यातला आनंद देऊन गेली आणि मलाच माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले, कुठून येतो इतका उत्साह, कश्या सुचतात ह्या भन्नाट कल्पना.त्यासाठी बहुदा फक्त नातवंड उपभोगता यावी लागतात.
नातवंड आणि आजी आजोबा हे ह्या जगातले सर्वात नि-स्वार्थी नातं असतं,दोघंही एकमेकांना भरभरून आनंद देतच राहतात. आपण त्यांना कितीही गोष्टी घेऊन दिल्या, त्यांच्या वर कितीही खर्च केला तरी आजीची कुशी आणि आजोबांच्या पाठीवरल्या घोड्याला कशाची तोड नाही.
आपल्या आठवणी आठवताना आपण किती नशीबवान होतो ना असं आपण म्हणतो, पण आपल्या पोरांच्या ह्या तयार होणाऱ्या आठवणी तेही तितकेच नशीबवान असल्याचे पक्के करतात.
नसेल त्याच्या आजोळी वाडा, नसेल शेत, नसतील बागा, नसतील गावची घरं पण आजोळाला आजोळ बनवणारे आजी आजोबा असणे हेच नशीबाचं दान खरं.
गौरी भिडे-दातार

Khup chan
ReplyDeleteवाह मस्तच
Deleteवाह मस्तच
Deleteखूप छान लिहिलं आहेस ग
ReplyDeleteउत्तम सहज लिखाण...... छान सैर झाली आजोळची 😊
ReplyDelete